ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा सोशल मीडियावर धुराळा

। अक्कलकोट : प्रतिनिधी
ताई माई अक्का, विचार करा पक्का.. किंवा येऊन येऊन येणार कोण… अशा अनेक घोषणा निवडणुकांमध्ये दणाणून जात. मात्र सध्या सोशल मीडियावरदेखील पोस्ट व्हायरल होत आहेत.परंतु त्या तुलनेत पारंपरिक प्रचार ठप्प झाला आहे. पूर्वी निवडणुका म्हटल्या की प्रचाराची राळ उडत असे.रिक्षा किंवा अन्य चारचाकी मोटारीवर पक्षाचे चिन्ह उमेदवाराच्या छबी आणि ध्वनिवर्धकावर ताई माई अक्का, विचार करा पक्का, अमुक अमुक वर मारा शिक्का अशा प्रकारच्या घोषणा हमखास दिल्या जात असे. दिवसभर गल्लीबोळातून फिरणार्या या रिक्षांवरील प्रचार कित्येकदा असह्य होत असे. परंतु त्यामुळे निवडणुकीचे वातावरण टिकून असे.पूर्वी रिक्षा किंवा ध्वनिक्षेपकावरून होणार्या प्रचारामुळे वातावरण ढवळून निघत असे. पारंपरिक उमेदवाराच्या घोषणादेखील सर्वांच्या तोंडपाठ होऊन जात. वेगवेगळ्या घोषणा लयबद्ध पद्धतीने दिल्या जात असल्याने त्या लक्षात राहायच्या. परंतु आता मोबाइलसारख्या हायटेकपद्धतीचा वापर केल्याने जुन्या पद्धतीचा प्रचार मागे पडत चालल्याचे दिसत आहे.
सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा उडत आहे.ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ग्रामीण भागात एक वेगळाच वातावरण तयार झाले आहे.घरोघरी पाय तुटवीत जावून मते मागण्याचा जमाना आता दूर होतांना दिसून येत आहे. तंत्रज्ञान वाढत आहे, त्याचा उपयोग आता ग्रामीण भागातील नागरिक देखील मोठ्या हुशारीने करतांना दिसत आहेत.
जसजशी वर्ष उलटताहेत, तसतसे प्रचाराचे स्वरूप बदलत चालले आहे. सुरुवातीला हस्ताक्षरात पोस्टकार्डवर मजकूर लिहून मत देण्याचे आवाहन केले जायचे. जसजशी साधनं आली तसतशी आवाहन करण्याची माध्यम बदलली.1990 ते 1995 पर्यंत तर छोटया गावात पक्षाचा प्रचार करणारी जीपगाडी भरदुपारी यायची. त्या गाडीत बिल्ले असायचे. ते गावात मतदारांना वाटले जायचे. गावातून जीप बाहेर पडताना बिल्ले मिळवण्यासाठी बच्चे कंपनी गाडीभोवती गर्दी करायची. गाडीत असणारे कार्यकर्ते पोरांना खुश करण्यासाठी ते वाटायचे.जीप चालायला लागायची. मुलं गाडीमागे धावायची. मागे बसलेला कार्यकर्ता बिल्ले मुलांच्या दिशेने भिरकावून द्यायचा, प्रचारगाडी धुराळा उडवून निघून जायची. मुलं ते भिरकावलेले बिल्ले वेचण्यात रमायची. प्रचारात भिती रंगवण्यावर विशेष जोर असायचा. चुना आणि निळीचा वापर करून कमी खर्चात भिती रंगवता यायच्या. जरा बरं अक्षर असलेल्याला अक्षरलेखनाची संधी दिली जायची, तर उर्वरित मंडळी भिंतीला चुना लावण्याचं काम करायची. यांनाच विजयी करा, असे आवाहन भिंतींवर असायचे आणि पक्षाचे चिन्हही रंगवलं जायचं तसेच मतदानाच्या स्लिपा लिहिणे, त्या पोहोचवणे, बूथवर बसणे ही कामे कार्यकत्रेच करायचे.
आता प्रचाराचे तंत्र आमूलाग्र बदलले आहे. या निवडणुका आणि पूर्वीच्या निवडणुका यांची तुलना होऊ शकणार नाही, पण पूर्वीच्या निवडणुका आठवल्या, त्यातील प्रचारतंत्र आठवलं की गंमत वाटते.फ्लेक्स, होर्डिगचा तो जमाना नव्हता. त्यामुळे जाहीर प्रचार म्हणजे पोस्टर. ती शहरातून छापून घ्यावी लागायची. ती रात्ररात्र जागून गावभर चिकटवली जायची. कापडी बॅनर्स तयार करणा-या चित्रकारांसाठी निवडणूक म्हणजे सुगीचे दिवस असायचे. कालांतराने फ्लेक्स आले, तेही कालबाहय व्हायला लागले.आता प्रचार थेट मोबाइलवर आला. एसएमएसचाही जमाना गेला.
‘ताई-माई अक्का, विचार करा पक्का ..वर मारा शिक्का’, ‘येऊन येऊन येणार कोण ..शिवाय दुसरा कोण’ अशा निवडणूक काळातील घोषणा आता हद्दपार होत असून घोषणांची जागा आता एसएमएस, फेसबुक आणि व्हॉट्सअप या आधुनिक माध्यमांनी घेतली आहे. निवडणूक लोकसभेची की ग्रामपंचायतची, मतदारांपर्यंत पोहोचण्यास वेगवेगळ्या प्रचारतंत्राचा अवलंब केला जातो. मात्र, आता आचारसंहितेची बंधने व प्रचाराला मर्यादित कालावधी यामुळे प्रचाराच्या पारंपरिक पद्धती कालबाह़्य होताना दिसत आहेत. संपर्काची आधुनिक साधने आल्यामुळे थेट मतदारांशी संपर्क करणे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकने काही क्षणात लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचता येते.