उडगी ग्रामपंचायत तिसर्यांदा बिनविरोध

। उडगी : प्रतिनिधी
तालुक्यातील उडगी ग्रामपंचायतीच्या नऊपैकी आठ जागा बिनविरोध करण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी उमेदवार न मिळाल्याने त्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे ती जागा रिक्त राहिली आहे.
यापूर्वी 1985 ते 1990 मध्ये उडगी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. यंदा कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुकीवर होणारा लाखो रुपये खर्च टाळून गटा-तटाचे राजकारण, हेवेदावे, भाऊबंदकी आदी बाबींना बगल देत गावात सामाजिक सलोखा व सद्भावना कायम ठेवण्यासाठी उडगी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत सामंजस्याने यंदा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.
गेल्या महिन्याभरापासून सामाजिक सलोख्यासाठी ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय उडगी : येथील ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामदैवत पीर जिंदावली दर्गाहसमोर एकत्र येत आनंद व्यक्त केला. गावपातळीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे गाव बिनविरोध काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर सकारात्मक व सामंजस्यपणाची भूमिका घेत या प्रयत्नांना यश प्राप्त झाले.
गावकर्यांच्या सल्लामसलतीने प्रत्येक समाजातील उमेदवारांना योग्य व समान संधी देण्यात आली. उडगी ग्रामपंचायत स्थापनेपासून तिसर्यांदा बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आमदार निधी व जिल्हा परिषद सदस्य यांच्या कोट्यातून विकासनिधी मिळत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीतील चुरस कमी व्हावी आणि गावाचा विकास व्हावा हा एकच ध्यास समोर ठेवून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामस्थांच्या मार्गदर्शन व सहकार्याने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात येत असल्याचे यावेळी गावकर्यांनी सांगितले.
गाव बिनविरोध करण्यात तंटामुक्त अध्यक्ष धोंडप्पा येळमेली, हणमंत कात्राबाद, ओंकारेप्पा हारकूड, महेश बिराजदार आणि प्रत्येक समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी परिश्रम घेतले.