अवैध वाळु व्यवसायास प्रोत्साहन देणार्या ‘त्या’ अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अवैध वाळु व्यवसायास प्रोत्साहन देणार्या ‘त्या’ अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
तालुक्यात 72 ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या आहेत. महसूल, गृह विभागाला मोठे काम लागलेले असतानाही काहीजण अधिकारी हे निवडणुकीच्या कामकाजात गुंतलेले आहेत, याचा फायदा घेऊन अवैध वाळु व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात असून तालुक्यातील विविध मार्गावरुन दररोज हजारो ब्रास वाळु ही मध्यरात्रीच्या दरम्यान पोहोचवली जात आहे. याकरिता दस्तुरखुद्द महसूल व गृह विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांकडून प्रोत्साहन देवून अवैध वाळु व्यवसायाला साथ दिली जात आहे. याबाबत आता परिवहन विभागाने लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.
शासकीय वाळुची निविदा लालफितीत अडकल्याने चोरटी वाळु वाहतुकीने तोंडवर काढलेले असून याबाबत आता परिवनह आरटीओ यांनी रात्र गस्ती वाढवून यास आळा घालणे गरजेचे असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी सदर खात्यास निर्देश देऊन चोरटी वाळु वाहतुक बंद करावेत व झारीतील शुक्राचार्य यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमातही काहीजण अधिकारी आपले हिश्ये भरण्याकरिता काम रात्रीचा दिवस करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी देखील लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.