अक्कलकोट नगरपालिका प्रशासन कुचकामी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर व शहरातील मुख्य रस्ता व पादचारी मार्गावर व्यापारी, भाजीपाला व पथविक्रेते अनधिकृत अतिक्रमण केल्याने पादचारी व वाहनधारकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
पालिकेने अतिक्रमण कारवाई केल्याचे निदर्शनास येत नाही. व्यापारी व अधिकारी यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत की काय असा संशय नागरिकांना येत आहे. त्यामुळे अतिक्रमणचा विळखा काही केल्या संपत नाही. श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानदार चक्क पदपथावर व रस्त्यावर हातगाड्या लावल्या जातात.
त्यामुळे तेथून सायकलस्वार तसेच पादचार्यांना चालणे व वाहन चालकांना वाहन चालविणे कठीण बनले आहे.
शिवाय बाहेरून आलेल्या भाविकाना तथाकथित पार्किंग ठेकेदारानी ठेवलेल्या टूकार पोराकडून पार्किंगमध्येच वाहने लावण्याचा तगादा लावत अर्वाच्य भाषेचा प्रयोग करीत अपमानास्पद वागणूक दिली जाते. तशेच अतिक्रमण केलेल्या व्यापारी सुद्धा भाविकांना किरकोळ कारणावरून समूहाने भांडणे करून दमदाटी केले जाते. इतकेच नव्हे तर आमदार, खासदार कोणाला बोलवायचे त्यांना बोलव असे मगरूरीची भाषा वापरली जाते. याचा नुकतेच मला स्वतःला प्रत्यय आला.
जन्म भूमीबद्दल आपुलकी व जिव्हाळा असल्याने आपल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा व सोलापूरी मालाचे ब्रँडिंग व्हावे म्हणून सोलापूर बाहेर राहणारे सोलापूरकर नेहमीच प्रयत्न करीत असतात.
सोलापूरी उत्पादने खूपच छान आहेत म्हणून प्रचार व प्रसार करीत असतो परंतू मात्र अशा घटनामुळे मन विषण्य होते. अक्कलकोट येथील बस थांब्यावर फळविक्रेते व रिक्षाचालकांच्या अतिक्रमणमुळे प्रवासी उतरताना अनेकवेळा अपघात झाले आहेत.
चारचाकी व दुचाकी वाहने यांमधून मार्ग काढताना विद्यद्ार्थी, महिला व जेष्ठ नागरिकांना अडथळ्याची शर्यत करावी लागत आहे.
नागरिक वेळोवेळी कारवाईची मागणी करीत असतात परंतू नगरपालिका त्या गोष्टीना केराची टोपली दाखवते.
तमाम नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने योग्य कारवाई करुन कायमस्वरुपी उपाययोजना करावे. अन्यथा प्रशासनाला सुद्धा येणार्या काळात नागरिकांच्या व भाविकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.