अहो आश्चर्यम ! बोरगाव मध्ये बंद बोअरवेलमधून चालू आहे पाणी!

। बोरगांव : प्रतिनिधी
कायम स्वरूपी दुष्काळात होरपळणार्या अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे. गावातील वीरशैव लिंगायत मठासमोर पिण्याच्या पाण्यासाठी 1997 साली कूपनलिकेसाठी एक बोअर मारण्यात आले होते. 1997 ते 2000 पर्यंत हे कूपनलिका चालू राहिले. पाण्याची पातळी कमी झाल्याने कूपनलिका बंद पडली. त्यानंतर हे केवळ दिवसातून 10 मिनिट चालायचे. गेल्या 20 वर्षांपासून बंद असलेल्या बोअरमधुन आता चक्क मोठ्या प्रमाणात व विद्युत मोटार चालू न करता त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत असून हे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.
बुधवार, दि.15 रोजी या बंद पडलेल्या बोअर मधून पाणी बाहेर येत असल्याचे गावकर्यांना दिसून आले. गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या चित्रा नक्षत्राच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यातसह सगळीकडे थैमान घातले आहे. त्यामुळे पाण्याचे सर्वच स्त्रोत ओसंडून वाहत आहेत. मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. ओढा, नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहे.
वीस वर्षापासून बंद असलेल्या कूपनलिकेच्या पाईप मधून 4 इंच आकाराचे पाणी बाहेर येत आहे. विना विद्युत मोटार न लावता या बोअर मधून पाणी वाहत असल्याने गावात चर्चेला उधाण आले.