दर्गनहळ्ळी तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पूजन

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यास वरदायिनी ठरणारी एकरुख उपसासिंचन अंतिम टप्प्यातील कारंबा पंपगृहात यशस्वी झाल्याने कॅनालव्दारे दर्गनहळ्ळी येथे सोडण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील एकरुख उपसा सिंचन लाभक्षेत्रात येणार्या टप्पा क्रमांक दोन म्हणजेच अंतिम टप्प्याच्या पंपगृहाची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर त्याच वितरण व्यवस्थेद्वारे आज दर्गनहळ्ळी तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. गेली चोवीस वर्षे आतुरतेने पाणी येण्याचे स्वप्न पाहणार्या शेतकर्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न रविवारी पूर्ण झाले. आता दर्गनहळ्ळी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याखालील रामपूर तसेच इतर छोटे छोटे तलाव देखील याच पाण्याने भरून मिळणार आहे. जिल्हाधिकारी यांनी शेतकरी वर्गाची अडचण लक्षात घेऊन तातडीने मार्ग काढल्याने शेतकर्यांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रमाला मंजुरी दिल्याने आज हे प्रकल्प पूर्ण होताना दिवस पाहावयास मिळत आहे असे प्रतिपादन यावेळी विविध मान्यवरांनी केले. यावेळी जलसंपदा विभागाचे माजी सचिव सी. ए.बिराजदार यांच्यासह या भागातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान यावर्षी मोठया पावसाने उजनी धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून आता धरणात येणारे जादा पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडले जात आहे. हे पाणी रामपूर व दर्गनहळ्ळी तलावात सोडून त्या भागात सतत जाणवत असलेली पाणी टंचाई दूर करावे यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवार, 10 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी चर्चा करण्यासाठी बैठक बोलविले होते. त्यावेळी जलसंपदा अधिकार्यांना आदेश देऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात आला होता. दर्गनहळ्ळी तलावात पाणी पोचले आहे. त्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, बसवंतराव कलशेट्टी, सरपंच प्रदीप जगताप, जिल्हा परिषद पक्षनेते अण्णाराव बाराचारे, विनोद बिराजदार, अप्पासाहेब पाटील, मल्लिनाथ ग्राम, नीलकंठ पाटील, शिवशरण वाले, सुनील सावंत, वैभव हलसंगे, श्रीशैल माळी, धानप्पा दहिटणे व पंचक्रोशीतील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.