विद्युत जनित्र नादुरुस्त; पाण्याविना शेतकर्यांचे हाल

विद्युत वितरण व्यवस्थेचा मनमानी कारभार; तक्रार देऊनही कोणीच घेईना दखल
। दहिटणे : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे दरी वस्ती येथील विद्युत जनित्र गेल्या आठ दिवसापासून जळाला आहे. शेतकर्यांनी याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीला तक्रार केली तरीदेखील विद्युत जनित्र नादुरुस्त राहिलेला आहे.यामुळे शेतकर्याचे प्रचंड हाल होत आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून आस्मानी संकट आणि आता लाईट उपलब्ध नसल्याने सुलतानी संकट शेतकर्यांसमोर उभे राहिले आहे.
गेल्या आठवडाभरापासून दरी वस्ती येथील विद्युत जनित्र जळाले आहे त्यामुळे शेतकर्यांना शेतातील पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरू लागले आहे. यंदा जास्त पावसामुळे संपूर्ण खरीप पीक वाया गेले आहे तसेच कांद्याचे रोप देखील जास्त पावसामुळे जळून गेली आहेत. त्यातून शेतकरी कसा बसा सावरत असतानाच आता विद्युत जनित्र जवळ जळाल्यामुळे दरी वस्ती येथील शेतकर्यांना पाणी देणे जिकिरीचे होऊ लागले आहे.
त्यामुळे शेतकर्यांना कांद्याच्या रुपांना व इतर पिकांना घागरीने पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाप खाऊ देईना आणि आई भीक मागू देईना अशी अवस्था शेतकर्यांची झाली आहे.त्यामुळे दरी वस्ती येथील विद्युत जनित्र लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी सर्व शेतकर्यांकडून होत आहे.
दरी वस्ती येथील विद्युत जनित्र हे कमी क्षमतेचे असल्यामुळे वारंवार यामध्ये बिघाड होत आहे आम्ही वारंवार नवीन ज्यादा विद्युत जनित्रा ची मागणी केली असून विद्युत वितरण कंपनी याबाबत उदासीन आहे. शेतकर्यांची अडचण लक्षात घेऊन आम्हाला लवकरात लवकर नवीन जादा जनित्र बसून द्यावे अशी मागणी आहे. – सौदागर खोडवे, शेतकरी