वटवृक्ष मंदिरात देवी व घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाची सुरुवात

। अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे नवरात्र महोत्सवा निमित्त देवीची स्थापना व घटस्थापना करण्यात आली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा कोणत्याही भाविकांना या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी वटवृक्ष मंदिरातील नवरात्र महोत्सवास जुनी परंपरा असून या नवरात्री महोत्सवास अनन्य साधारण असे महत्व आहे.
नारीशक्तीच्या या उत्सवात अनेक माता, भगिनी या देवीचे दर्शन घेवून पावन होत असत. या नवरात्र महोत्सव कालावधीत देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या विश्वस्त उज्वला ताई सरदेशमुख यांच्या आधिपत्याखाली 3 दिवसीय देवी महात्म्य या पोथीचे पारायण आयोजन करण्यात येत असते, दरवर्षी अनेक महीला भक्त या पारायण सेवेत सहभागी व्हायचे. कोजागरी पौर्णिमेस देवस्थानकडुन महानैवेद्य दाखवून दुध प्रसाद वाटप होवून या उत्सवाची सांगता व्हायची, परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भाव व वाढता संसर्ग लक्षात घेता गेल्या 17 मार्च 2020 पासून अद्यापही वटवृक्ष स्वामींचे मंदिर बंद आहे. त्यामुळे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी देवी महात्म्य पोथीचे पारायण सेवा यंदा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे सर्व भक्तांनी विशेषता महिला भक्तांनी यंदा आपल्या घरीच राहून देवीची आराधना व पारायण सेवा करावी असे मनोगत इंगळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, विपुल जाधव, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, सिद्धाराम कुंभार आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी सॅनिटायझर वापरण्याचे व मास्क लावण्याचे अनुपालन केले.