यंदा नो पॉलिटिक्स, ओनली डेव्हलपिंग, मग होऊन जाऊद्या बिनविरोध

। अक्कलकोट : प्रतिनिधी
सर्वपक्षीय पुढार्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका अविरोध करण्याबाबत पुढाकार घेण्याबाबतचा सूर सर्व स्तरातून निघत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या आहेत. गेल्या 9 ते 10 महिन्यात कोवीड-19 मुळे जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वच बाबतीत प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र समोर असताना गाव पुढार्यांनी यंदा आपआपसातले मतभेद बाजुला सारुन तालुक्यातील सर्वपक्षीय पुढार्यांच्या हातभाराने निवडणुका अविरोध होण्याकामी प्रयत्न करावेत, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून याबाबतीत देशापासून गावच्या हिताकरिता निवडणुका होऊ न देता अक्कलकोट तालुक्याने आदर्श निर्माण करावा असे सर्व स्तरातून बोलले जात आहे.
यंदा केवळ सावरण्याचे दिवस असल्याने गावातील हेवेदावे, राजकारण बाजुला ठेवून समझोत्याच्या माध्यमातून गाव कस बिनविरोध होईल याकरिता गाव पुढार्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी निवडणूक लागल्यावर कसा जोर असतो तसेच अविरोध करण्यासाठी खर्च करावेत.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तर सुरुवातीलाच अविरोध होणार्या ग्रामपंचायतीकरिता रु.15 लाखांची घोषणा केलेली आहे. याबरोबरच मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी वडिल स्व.हणमंतराव कट्टीमनी यांच्या स्मरणार्थ दहा हजार लोकसंख्या असलेल्या बिनविरोध गावास विंधनविहीर मारुन देण्याची घोषणा केलेली असून यंदा गावपुढार्यांनी राजकारण बाजुला ठेवून केवळ गावच्या विकासाचा नारा देत गावची निवडणूक होऊ न देता अविरोध काढावी असे सर्वच थरातून बोलले जात आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस
। अक्कलकोट : प्रतिनिधी
येत्या 15 जानेवारी रोजी होणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोट तालुक्यात एकूण 1 हजार 883 अर्ज दाखल करण्यात आले त्यापैकी 58 अर्ज अवैध ठरले आहेत. यासोबतच अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी राजकीय नेतेमंडळींच्या बैठकांना जोर आला आहे.
करोना संकटात गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी इच्छुक उमेदवारांची निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू होती. तीन नगरपालिका आणि 128 ग्रामपंचायती असलेल्या अक्कलकोट तालुक्यात 72 ग्रामपंचायतींमध्ये यंदा निवडणुका आहेत. या 72 ग्रामपंचायतींमध्ये 235 प्रभागांमधील 634 जागांसाठी 1 हजार 883 अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी छाननीत 58 अर्ज अवैध ठरले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर आता जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी गावागावांमध्ये बैठकांचा जोर वाढला आहे. आज 4 जानेवारी 2021 रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तालुक्यातील किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.