फडणविसांनी दोन आमदार ‘दादां’ची अमित शहांशी भेट घडवून आणली

। पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील साखर उद्योगासमोरच्या विविध अडचणीं संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नतृत्वाखाली शिष्टमंडळाशी आज चर्चा केली. विशेष म्हणजे या शिष्टमंडळात राज्यातील दोनच आमदार होते. भीमा कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल आणि अकलूजच्या शंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील हे दोघे साखर कारखनदारांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत मिळावी, थकीत कर्जाचे पुर्नगठन करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांसह साखर उद्योगाशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रश्न सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन अमित शहांनी दिल्याचे राहुल कुल यांनी सांगितले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, माजी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांचे कारखाने सध्या अडचणीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले अनेक नेते सध्या भाजपात आहेत. मात्र फडणवीस यांनी कुल आणि मोहिते-पाटील यांना बरोबरच घेतल्याने त्याची वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. हे दोन्ही नेत्यांना आपापल्या मतदारसंघात ‘दादा’ म्हणून ओळखले जाते. दोघेही राष्ट्रवादीतून भाजपात आले आहेत.
राज्यातील 30 साखर कारखान्यांना सुमारे 372 कोटी रुपयांची थकहमी राज्य सरकारने मंजूर केली आहे. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन झाल्याने बहुतांश साखर कारखाने सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय घेताना काही राजकीय कुरघोड्या देखील झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्याला थकहमी मिळाली नसल्याने राष्ट्रवादीचा अजून त्यांच्यावरचा राग गेला नाही का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राष्ट्रवादीने केलेली कुरघोडी कुल यांनी अमित शहांच्या कानावर घातली की काय? अशीही शंका व्यक्त होत आहे.
या 30 साखर कारखान्यांत सर्वाधिक थकहमी ही काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मिळाली आहे. सुमारे 30 कोटी रुपयांच्या कर्जासाळी या कारखान्याच्या कर्जाला सरकारने हमी दिली आहे. याशिवाय रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याला 28 कोटी रुपयांची आणि त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातील विघ्नहर कारखान्याला 24 कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला 10.77 कोटींची थकहमी मिळणार आहे. या 30 कारखान्यांत भाजपच्या नेत्यांचेही कारखाने आहेत. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते-पाटील असोत की काँग्रेस सोडून भाजपत आलेले हर्षवर्धन पाटील यांच्याही कारखान्यांना थकहमी देण्याचा ‘उदारता’ सरकारने दाखवली आहे. मात्र पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीतून रासपमध्ये आणि तेथून भाजपात आलेले राहुल कुल यांच्या भीमा-पाटस कारखान्याचे नाव मात्र या यादीत नाही.
पुणे जिल्ह्यातील विघ्नहर, राष्ट्रवादीचे आ.अशोक पवार यांचा रावसाहेब पवार घोडगंगा कारखाना, काँग्रेसचे आ.संग्राम थोपटे यांचा राजगड, अजित पवार यांचे नेतृत्व मानणारा छत्रपती या साखर कारखान्यांना थकहमी मिळालेली असताना आर्थिकदृष्ट्या सर्वांत अडचणीत असलेला भीमा-पाटस यातून निसटला आहे. या मागे काही राजकीय कारणे तर नाहीत ना, अशी आता यावर चर्चा सुरु झाली आहे. भाजप आ.राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती. कुल कुटूंबिय हे 2014 पर्यंत पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतंत्रपणे आपले राजकीय अस्तित्व दाखवून देण्यास सुरुवात केली.