प्रतिष्ठितांच्या पुढाकारामुळे तोळणूर बिनविरोध

। तोळणूर : प्रतिनिधी
तालुक्यातील तोळणूर येथील स्थानिक राजकीय गटाने व गावातील नागरिकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याने गावात आनंदोत्सव साजरा केला. तोळणूर ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 27 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल होते. मात्र, सोमवारी माघार घेण्याच्या दिवशी 16 जणांनी अर्ज माघारी घेतल्याने सर्वच 11 जागा बिनविरोध होण्यास यश आले.
बिनविरोध निवडीनंतर गावातील नागरिकांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तोळणूर येथील ग्रामपंचायतीचे 4 प्रभाग असून एकूण 11 सदस्यसंख्या आहे. मागील काही दिवसांपासून गावातील स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी गटाच्या गटप्रमुखांना ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले होते. 11 जागांसाठी अपक्षांसह एकूण 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार गावातील गटप्रमुख व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपसात चर्चा करून बिनविरोधासाठी प्रयत्न केले.
अखेर माघारीच्या दिवशी गावासाठी घेतलेली भूमिका व उमेदवारांनी दाखविलेला समंजसपणा यामुळे सदस्यांच्या जागावाटपात तडजोड झाली. शेवटी सोमवारी 27 पैकी 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सर्व 11 जागा बिनविरोध झाल्या. नवनिर्वाचित सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे : वॉर्ड क्रमांक एक- संजयकुमार व्हटकेरी, प्रीती वालीकर, विजयालक्ष्मी हुलमनी. क्रमांक दोन- सिद्रामप्पा पाटील, प्रवीण रब्बा, श्रीदेवी मनगुळी. वॉर्ड क्रमांक तीन- मल्लिनाथ म्हेत्रे, इंदुमती माळी, वॉर्ड क्रमांक चार -रमेश उप्पीन, शांताबाई हुलमनी, ज्योती फुलारी. गाव बिनविरोध होण्यासाठी महारुद्र शिवमूर्ती, संगमेश्वर पाटील, बाबूराव गुड्डेवाडी, रामण्णा उण्णद, आप्पासाहेब कुसगल आदींसह ग्रामस्थांनी मिळून प्रयत्न केले. या सवार्र्ंचे कौतुक होत आहे.