परतीच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यात तांडव; पिके वाया गेल्याने शेतकरी हतबल

Borgaon

। बोरगांव (दे) : प्रतिनिधी
मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या चित्रा नक्षत्राच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्‍यांची पुन्हा एकदा थट्टा मांडली आहे. अक्कलकोट तालुक्याला काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने कुरनुर धरणासह इतर जलस्त्रोत क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने ओव्हरफ्लो वाहत होते.दहा दिवसांच्या उघडीपनंतर चित्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामूळे तालुक्यातील धरण, तलाव,ओढे,नाले,विहिरी ओसंडुन वाहत आहेत. मंगळवारी सायंकाळी 10 च्या दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील ओढ्याना महापूर आला होता. ओढ्याचे पाणी शेतीसह गावात ही शिरले. रस्त्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेले असल्याने मार्ग बंद झाले होते. शेतकरी मजूर यांना शेतीकडे जाण्यास अनेक संकटाना सामोरे जावे लागले.पुलावरून पाणी न ओसरल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला होता.शेताला जाणारे सर्वच मार्ग जलमय झाल्याने शेतातील जितराब संध्याकाळ पासून चारा पाण्यापासून उपाशी होते.मंगळवार रात्रीपासून तालुक्यातील अनेक गावात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे पिण्याचे पाणी, पिठाची गिरणी, मोबाईल टॉवर बंद पडले होते त्यामुळे एकमेकांना संपर्क करताना नाहक त्रास सहन करावा लागला.दुसरीकडे कांदा, मका, तूर,ऊस,वेलवर्गीय फळे, फुलशेती, फळबागासह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बांध बंधारे फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावचा संपर्क तुटला. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील पुलांची उंची वाढवण्याची मागणी असताना प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले.पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नागरिकांना पुलावरून ये-जा करावी लागते. पुलावरून आठ ते दहा फूट पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. वाहतुकीची सर्व साधने बंद पडली.
उभ्या पिकात पाणी साचून राहिले. हातातोंडाशी आलेले पीकही गेले. शेतकर्‍यांची शेतातल्या पाण्याने तोंडचे पाणी पळाले अशी अवस्था झाली आहे. झालेल्या नुकसानीचे भरपाई देणार का ? याकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. शेतकरी संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने भरीव मदतीची शासनाने उपाययोजना करावी अशी मागणी होत आले.
अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेले कुरनुर धरण 100 टक्के भरले आहे.धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे वरून येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे पूर्ण उघडे करण्यात आले. यामुळे धरणातून बोरी नदी पत्रात प्रति सेकंद 3000 क्यूसेक पाणी सोडण्यात आला आहे. यामुळे बोरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चित्रा नक्षत्राच्या जोरदार पावसामुळे खालच्या बाजूस पाणी सोडण्यात आले आहे. अक्कलकोटला तालुका ता.14 ऑक्टोबर 2020 रोजीची नोंदलेली पावसाची आकडेवारी (बाहेरची आकडेवारी आजची तर कंसातील आकडेवारी एकूण पावसाची मिलिमीटर मध्ये) अक्कलकोट : 36 (375), चपळगाव : 33 (436), वागदरी : 26 (425), किणी : 29 (477), मैंदर्गी : 20 (373), दुधनी : 43 (578), जेऊर : 28 (303), करजगी : 27 (282), तडवळ : 24 (266) असे एकूण 266 (3515 मिमि) पाऊस पडले आहे.

आमच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. पाणी आटल्याशिवाय पिके घेता येणार नाहीत. शेतात अजून पाणीच पाणी आहे. त्यामुळे हे पाणी आटल्याशिवाय पिके घेता येणार नाही. तसेच हंगाम संपल्यानंतर कोणते पीक हाती घ्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. जमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनाने भरपाई देऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.
बालाजी पाटील
शेतकरी, बोरगाव दे

About Author