चोरीस गेलेले मुद्देमाल मालकाला परत; उत्तर पोलिस ठाण्याची कामगिरी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट येथे आठ महिन्यापूर्वी दिवसाढवळ्या एका घरातून पाच तोळे सोने चोरुन नेलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद करुन सापडलेले मुद्देमाल संबंधित मालकाला उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कलप्पा पुजारी व त्यांच्या डी.बी. पथकाने सुपूर्द केल्याने शहरवासियांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही वर्षापासून अक्कलकोट शहरातील विविध भागात अनेक चोर्या झाल्या मात्र त्यातील बहुतांश चोर्या हे उत्तर पोलिस ठाण्याचे पो.नि. कलप्पा पुजारी व त्यांच्या डीबी पथकांना उघड करण्यात यश आलेले आहे. अक्कलकोट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातील मधला मारुती येथील शिक्षक सचिन बंडोपंत पवार यांचे गेल्या आठ महिन्यापूर्वी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेल्या पाच तोळे सोने कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची फिर्याद 13 फेब्रुवारी 2020 रोजी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड, पो.नि.कलप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील हवालदार सिद्राम धायगुडे, पो.ना.महादेव चिंचोळकर, पो.कॉ.जगदीश राठोड, पो.ना.धनराज शिंदे या पथकाने हाती घेतले आणि शहरात विविध ठिकाणी लावलेल्या दुकानदार, व्यापारी यांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमांतून एका संशयित फिरणार्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेवून पोलिसांचे कौशल्य वापरुन विचारपूस केली असता संबंधित महिलेने चोरल्याचे उघडकीस आल्याने महिलेस अटक करुन तिच्या राहत्या घरातून वरील वर्णनाचे पाच तोळे सोने जप्त करुन कोर्टाच्या आदेशानुसार गुन्ह्यातील जप्त केलेले सर्व मुद्देमाल संबंधित शिक्षक सचिन बंडोपंत पवार यांना सुपूर्द करण्यात आले. या तपास कार्याचा अक्कलकोट शहर व तालुका वासियांतून समाधान व्यक्त केले जात आहे.