कांदा बाजार येथील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्याची मागणी

Kanda Bajar

अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट येथील प्रसिध्द कांदा बाजार येथे शेतकरी व छोटे भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी सोयीस्कर व्हावे यासाठी तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी यांनी केली होती. मात्र काही भाजी विक्रेत्यांनी गेल्या 27 वर्षापासून कब्जा करुन बसल्याने सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांचे हेळसांड होत असून शिवाय कोट्यावधी रुपयाचे नगरपालिकेचे कर बुडत असतानाही सत्ताधारी व विरोधकांनी चिडीचुप का? असा संतप्त सवाल शहरवासियांतून होत आहे.
सन 1993 साली तत्कालीन नगराध्यक्ष व त्यांच्या सर्व पदाधिकारी व अधिकार्‍यांनी ग्रामीण भागातून येणार्‍या शेतकर्‍यांना किरकोळ भाजी विक्रेत्यांना ऊन, पाऊस, वार्‍याचा त्रास होवू नये म्हणून सर्व कठड्यावर पत्र्यांचा शेड, विद्युत कनेक्शन, सुलभ शौचालय, पाण्याचे हौद असे सुसज्ज असलेली आठवडी बाजार रोज भाजी विक्रेत्यांना वापरता यावे असे विविध उपाय योजना करुन बांधण्यात आले होते. मात्र नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ व गलथान कारभारामुळे 1992 ते आजतागायत आलटून-पालटून सत्तेवर आलेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अक्कलकोट नगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे भाडे बुडालले आहे.
मात्र काही दिवसातच या कठड्यावर काही बागवान बांधवांनी कब्जा केला आणि त्या कठड्याला ऑफिस व गोडावूनचे स्वरुप आणले. या परिसरात शेतकर्‍यांच्या व व्यापार्‍यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले स्वच्छतागृहात गोडावूनमधील कुजलेली फळ व भाज्या या ठिकाणी आणून टाकत असल्याने येथे उकिरड्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. महिनोनमहिने या टाकलेल्या फळ व भाज्यांच दुर्गंधी उठून परिसरातील व्यापारी संकुलनातील सर्व व्यापार्‍यांना या दुर्गंधीचा त्रास होत आहे. याबाबत आजपर्यंत बहुतांश संघटनेनी व नागरिकांनी अक्कलकोट नगरपालिकेकडे तक्रार करुनही याची दखल घेतली गेलेली नाही. सन 2011 साली तत्कालीन मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी संबंधित कब्जेधारकांना कब्जा असलेली जागा तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी कब्जे धारकांनी लाखो रुपये या जागेचा भाडे भरण्यास तयार होते. परंतु त्यांचे अचानकपणे इतरत्र बदली झाले. त्यांच्या बदलीनंतर नगरपालिका प्रशासनाने बुडित भाडे वसुल करणे अपेक्षित होते. परंतु अद्याप केलेला नाही. मग अशा या धनदांडग्यांना कोण पोसतोय?
प्रत्येक पक्षातील राजकीय नेत्यांनी मतदारांचे गोळा बेरीज करीत अक्कलकोट शहरात अतिक्रमण धारकांना खतपाणी घालत असल्यामुळे शहरास विद्रुपीकरण आलेले आहे. मात्र अशा व्यापार्‍यांकडून अक्कलकोट नगरपालिकेनी रोज पाच ते दहा रुपये कर वसुल करीत असते. मात्र गेल्या 27 वर्षांपासून या भाजी कठड्यावर अतिक्रमण करुन आपले बस्तान मांडणार्‍या बागवान बांधवाकडून अद्यापपर्यंत एक दमडीही वसुल करण्यात आलेले नाही. अशा समुदायाच्या पाठीमागे कोणाचे हात आहे? यासाठी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ येत असल्याचे शहरवासियांतून बोलले जात आहे.

About Author