हौशी पर्यटकांचा जीव धोक्यात, धरणाची सुरक्षितता वार्यावर

। चपळगांव : प्रतिनिधी
संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेले कुरनुर धरण गेल्या आठवड्यात शंभर टक्के भरले. यामुळे तालुक्यातील जनतेला चांगलाच फायदा होणार हे खरे.मात्र गेल्या दोन दिवसांपासून चित्रा नक्षत्राच्या पावसाने सर्वदुर हजेरी लावल्याने कुरनूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे.धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत.सोडलेल्या पाण्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी बुधवारी तालूक्यातील हजारो पर्यटक जमले होते.काहींनी धरणाच्या दरवाज्यासमोर धोकादायक पध्दतीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला.मात्र याकडे पाहण्यासाठी सुरक्षारक्षकच नसल्याने कुरनूर धरण मौत का कुवा बनल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
धरणावरील भौतिक स्थितींचा अभ्यास केल्यास काही तांत्रिक बाबींमुळे धरण मौत का कुवॉ बनल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटबंधारे खात्याने साफ दुर्लक्ष केल्याने कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
822 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या कुरनूर धरणावर अगोदरच सौरदिव्यांची चोरी, बंद अवस्थेतील पथदिवे ,धरणावरील रस्त्यावर पडलेल्या भेगा,ज्या दरवाज्यांतुन पाणी सोडले जाते त्या सर्व दरवाज्यांचे स्वयंचलित यंत्र उघडे असल्याने कुरनूरचे धरण जणू स्मशानच ठरत आहे. याबाबतीत काही दिवसांपूर्वी लोकमतने मालिकेमधून आवाज उठविल्यानंतर धरणावर सुरक्षारक्षक नेमले होते.मात्र सद्यस्थितीत एप्रिलनंतर याठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पर्यटकांनी जीव धोक्यात घालू नये, संबधितांनी तात्काळ कार्यवाही करावी
सद्यस्थितीत कुरनूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांची गर्दी वाढत जात आहे. सुरक्षारक्षकच नसल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोणताही धोका होणार नाही. पाटबंधारे खात्याने कुरनूर धरणावर तात्काळ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यासाठी कार्यवाही करावी.
व्यंकट मोरे, सरपंच,कुरनूर
वरिष्ठांकडे सुरक्षारक्षकांची मागणी
सध्या कुरनूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे.धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणी येत आहे.दरवाजे उघडले असले तरी दरवाज्यांवरून पाणी वाहत आहे.अशा भयाण प्रसंगी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता धरणावर सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे.मात्र एप्रिलपासून याठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने धोका निर्माण झाला आहे.ही बाब लक्षात घेऊन मागील आठवड्यात वरिष्ठांकडे मागणी केली आहे.
प्रकाश बाबा
उपविभागीय अभियंता, बोरी मध्यम प्रकल्प