हिरोळी येथील युवकास ठार मारुन सांगवी नदीपात्रात टाकल्याने खळबळ
। अक्कलकोट : प्रतिनिधी
सांगवी बु॥ (ता.अक्कलकोट) येथील बोरी नदीच्या पात्रात एका 35 वर्षीय इसमास जीवे ठार मारुन पोत्यात बांधून टाकण्यात आल्याचे गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी शाणप्पा नागप्पा सुणगार (वय : 40, रा.हिरोळी, ता.आळंद, जि.कलबुर्गी) यांचे बंधू मयत मल्लप्पा नागप्पा सुणगार (वय 35, रा.हिरोळी) हा भीमपूर (ता.आळंद) येथे 2 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्रो 9.30 रोजी भजन ऐकण्यासाठी जातो म्हणून गेलेला होता.
2 ऑक्टोंबर रात्रो 9.30 ते 9 ऑक्टोंबर 2020 रोजी दु.1 वाजणेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन अज्ञात ठिकाणी त्याचे डोकेवर कशाने तरी मारुन त्याचे दोरीने पाय, गळालगत बांधून पोत्यात घालून सांगवी बु॥ (ता.अक्कलकोट) येथील बोरी नदीच्या वाहत्या पाण्यात टाकून दिले आहे. त्यास जीवे ठार मारले म्हणून अज्ञात इसमाविरुध्द फिर्यादीच्या सांगण्यावरुन अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील अधिक तपास पो.नि.कलप्पा पुजारी हे करीत आहेत. मयताचे शवविच्छेदन करुन मयताच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सांगवी नदीपात्रात पोत्या बांधून काही तरी टाकण्यात आलेले आहे. आणि त्याचे दुर्गंधी परिसरात पसरलेला आहे, अशी माहिती भ्रमणध्वनीवरुन सांगवी ग्रामस्थाकडून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यास देण्यात आले होते. येथील कर्तव्यदक्ष कलप्पा पुजारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता या पोत्यात कुणीतरी अज्ञात व्यक्तीनी अज्ञात कारणावरुन जीवे ठार मारुन पोत्यात बांधून नदीपात्रातील पाण्यात टाकून दिले होते. त्या मयताच्या खिशात ओळखपत्र आढळून आल्याने कर्नाटकातील हिरोळी येथे जावून मयताच्या नातेवाईकांना आणून त्याची ओळख पटवून देण्यात आली. त्यानंतर घटनेच्या ठिकाणी पंचनामा करुन त्याच ठिकाणी मयताचे शवविच्छेदन करुन मयताच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.