शेडनेटच्या विविध पिकांतील जिद्दी मास्टर !

ग्रोवनमधील यशकथा, लेख वाचूनच शेतीला मोठे बळ मिळाले, नवे प्रयोग घडले असे पुंजाराम भूतेकर (हिवर्डी, जि. जालना) सांगतात.
न कळण्याच्या वयात आईचे छत्र हरविले. पण वडिलांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, धैर्य अशा विविध गुणांचा वापर करून पुंजाराम भूतेकर (हिवर्डी, जि. जालना) आज यशस्वी व प्रयोगशील शेतकरी म्हणून पुढे आले आहेत. शेडनेट शेतीत विविध पिके घेत त्यातील मास्टर झाले आहे. दुष्काळ, गारपीट यांचा सामना करूनही शेतीत कर्जमुक्त झाले आहेत.
न कळण्याच्या वयातच म्हणजे तीन वर्षे वय असतानाच पुंजाराम अंकुशराव भूतेकर (हिवर्डी, ता. जि. जालना) यांना आपली आई गमवावी लागली. माउलीचे छत्र हरवल्याने दु:खाचा डोंगर उभा राहिला. आर्थिक परिस्थिती हलाखीची. शेती कोरडवाहू आणि तीही चार एकर. गरिबीला तोंड देत दहावीपर्यंत पुंजाराम यांनी शिक्षण पूर्ण केले.
सतत संघर्षच
दहावीनंतर वडिलांना आधार देत शेती व मजुरी करण्यास पुंजाराम यांनी सुरवात केली. सन 2003 मध्ये दुग्धव्यवसाय सुरू केला. पैशांची अडचण असल्याने ङ्गमोबाईल रिचार्जफ प्रमाणे ग्राहकांकडून महिन्याच्या आधी दुधाचे पैसे जमा करून घेऊन त्यांना दूध दिले जायचे. या व्यवसायातून शेतीला आर्थिक बळ मिळाले. पुढे काही कारणामुळे व्यवसाय थांबवावा लागला.
तज्ज्ञांचे घेतले मार्गदर्शन
कोरडवाहू शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसे. सन 1999 मध्ये जालना- खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) मार्गदर्शनाखाली कापूस पिकात प्रयोगांना सुरवात केली. घरचा व शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता. अशावेळी केव्हीकेच्या माध्यमातून संरक्षित शेती (शेडनेट) बद्दल माहिती मिळाली. ग्रोवनचेही वाचन नियमित सुरू होते. अखेर 10 गुंंठ्यात शेडनेट उभारून उत्पन्नाची नवी वाट शोधण्याचे नक्की केले.
कोणीही कर्ज देईना
दहा गुंठ्यांसाठी सुमारे पावणेतीन लाख रुपये उभे करण्याची गरज होती. जमीन अत्यंत कमी. कोणीही कर्जासाठी उभे करेना. मग पुंजाराम परिसरातील लोकमंगल या प्रगतिशील व सधन शेतकर्यांच्या गटात सामील झाले. त्या माध्यमातून कर्ज मिळाले. साधारण 2008-09 ची ही गोष्ट. अत्यंत अभ्यासूवृत्ती, तज्ज्ञांचे सतत मार्गदर्शन घेणे व अखंड कष्ट यांच्या जोरावर पुंजाराम यांनी शेतीत भरीव कामगिरी करण्यास सुरवात केली. उत्पादन चांगले मिळाले. पैसेही हाती चांगले आले.
दुष्काळ, गारपिटीच्या संकटाने उदध्वस्त
सर्व काही स्थिर होत आहे असे वाटत होते. सन 2012 च्या दुष्काळात कारले पिकाचाही प्रयोग केला.पाणीटंचाईमुळे पाणी कमी पडू लागल्याने टँकरने पाणी विकत घेऊन उत्पादन सुरू ठेवले. परंतु, गारपिटीच्या संकटाने घाला घातला. संपूर्ण शेडनेट उदध्वस्त झाले.
जिद्द सोडतील तर ते पुंजाराम कसले?
कोणत्याही परिस्थितीत शेडनेट शेती सोडायची नाही अशीच जिद्द ठेवली होती. हिंमतीने संकटांशी सामना केला. आता 40 गुंठे शेडनेट करायचे असा पण केला. केव्हीके, मित्र परिवार, अडते, व्यापारी यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांचा मोठा आधार मिळाला. बँकेतही पत वाढली होती. त्यावर कर्ज मिळाले. शेडनेटमध्ये एका एकरात ढोबळी मिरची घेण्यास सुरवात केली.
पुण्यात मार्केटिंगसाठी पुढाकार
गटाबरोबर काम करीत असताना पुण्याची बाजारपेठ शोधण्यासाठी पुंजाराम यांनी पुढाकार व कष्ट घेतले. रात्रंदिवस एक करीत गटाची मिरचीदेखील पुणे बाजारपेठेत विकलीदेखील. एकरात सुमारे 44 टन ढोबळीचे उत्पादन घेण्यात पुंजाराम यांनी यश मिळवले. शेडनेट शेतीत स्थिरता व हुकमीपणा मिळवला.
शेडनेटमध्ये टोमॅटो
यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जालना केव्हीकेने अर्का रक्षक या टोमॅटो वाणाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले. बंगळूर येथील आयआयएचआर या फलोत्पादनातील संशोधन संस्थेतर्फे विकसित ही जात आहे. त्याची रोपेही केव्हीकेने पुंजाराम यांना दिली. नेहमीप्रमाणे मेहनत घेत एका एकरांत सुमारे 20 ते 22 टन उत्पादन घेण्यास पुंजाराम यशस्वी झाले. क्रेटला 200, 400 ते अगदी काही काळ तर एकहजार, 1700 रुपये असाही दर मिळाला. सुमारे साडेपाच लाखांचे उत्पन्न हाती आले