मराठी शाळा नसलेल्या गावात शाळा सुरु करण्याचे आ.कल्याणशेट्टी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सिमावर्ती भागात कन्नड प्राथमिक शाळांचे शिरकाव या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द झाली होती. याची गंभीर दखल घेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना 15 दिवसात अक्कलकोट तालुक्यात मराठी शाळा नसलेल्या गावात मराठी शाळा चालु करण्याचे पत्र दिल्याने शिक्षण विभागात मोठी हालचाल सुरु झालेली आहे, यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्यात सध्या मराठी माध्यमाचे 164, कन्नड 71 व उर्दु माध्यमांचे 24 असे एकूण 159 प्राथमिक शाळा कार्यरत असून यामध्ये तालुक्यातील ममनाबाद, इटगे, भोसगे, तोरणी, हालळ्ळी मै, जकापूर या सहा महसूली गावात व दुधनी भीमनगर, गांधीनगर, जेऊर धनगरवस्ती, गोपाळ तांडा, कडबगाव, नालवार वस्ती, नरोणे वस्ती, भोसगे तांडा, नागणसूर बंधू वस्ती, हैद्रा तांडा हिप्परगे वस्ती, रेडगोळ वस्ती, नागलगाय वस्ती असे 6 गावे, 12 वस्त्या मिळून 18 ठिकाणी मराठी शाळाच नसल्याने या बाबत कन्नड माध्यम शाळांचा शिरकाव या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. त्याचे अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना महाराष्ट्रातील मुले मराठी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात ज्या ठिकाणी मराठी शाळाच नाही अशा ठिकाणी कन्नड शाळेबरोबर मराठी शाळा चालु करण्याबाबतचे लेखी पत्र दिल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी हालचाल सुरु झाली असून शिक्षण विभागाने ज्या-त्या गावच्या ग्रामपंचायती ठरावानुसार शाळा सुरु करण्यापेक्षा ज्या गावात मराठी शाळा नाही अशा गावात पालक व विद्यार्थ्यांना प्रबोधन करुन सर्व गावात इतर माध्यमा बरोबर मराठी माध्यमाच्या शाळा सुरु कराव्यात असे सूर तालुक्यातील सर्वसामान्य पालक व विद्यार्थ्यांमध्ये उमटत आहे.