बोरी नदीच्या धोक्यामुळे मोट्याळच्या पुनर्वसनाची मागणी

Sangavi1

। मोट्याळ : प्रतिनिधी
शहर आणि तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर मोट्याळ गावामध्ये पाणी शिरले असून त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी करण्यात येत आहे. पाच-सहा वर्षे असा विचार झाला होता पण प्रशासनाकडून पुढे कार्यवाही झाली नाही ती करणे गरजेचे आहे, असे माजी सरपंच कार्तिक पाटील यांनी सांगितले.
दोन दिवसांपासून कुरनूर धरणातून बोरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग इतका मोठा आहे की मोट्याळ गावालगत असलेली बोरी नदी तुडुंब भरून वाहू लागल्याने गावामध्ये पाणी शिरले आहे. तत्काळ रातोरात तेथील नागरिकांना स्थलांतरित केल्यामुळे जीवित हानी टळली असून जीवाच्या भीतीने हातात सापडेल ते घेऊन अंधारात धावत लोक सुरक्षित ठिकाणी गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. घरातील सर्व वस्तूंची मात्र मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून महत्त्वाची कागदपत्रे, अन्नधान्य भिजले आहे. तसेच वाचनालयमध्ये पाणी शिरले आहे. सर्व विद्युत उपकरणे पाण्यात पोहताना दिसत आहेत व घरातील सर्व वस्तूंची नासधूस झाली आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्वरित पंचनामा करून लवकरात लवकर मदत मिळावी व गावाचे पुनर्वसन व्हावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

About Author