पाझर तलाव भरल्याने शेतकर्‍यांचा रस्ता बंद

Shirval

शिरवळ (ता.अक्कलकोट) येथील पाझर तलाव तुडूंब भरल्याने गट नं.163/3 मधील पन्नास शेतकर्‍यांना शेताला जाण्याचा रस्ता पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिरवळ येथील पाझर तलाव झाल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात सदरील पाझर तलाव तुडूंब भरुन सांडव्यातून पाणी वाहत असते.
यंदा अक्कलकोट तालुक्यात भरमसाठ पाऊस झाल्याने तलाव भरुन सांडव्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने जूना शिरवळ रस्ता ते बादोला-बोरगाव रस्त्यावरील गट नं.163/3 मधील पन्नास शेतकर्‍यांचा शेताकडे जाण्याचा रस्ता पाण्यात गेल्याने अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या सुगीचे दिवस असल्याने व रब्बी पेरणीच्या हंगामाला देखील सुरवात झालेली आहे. मात्र या रस्त्यावर 10 फुटाहून अधिक पाणी साचल्याने पाण्यातून रस्ता काढत बैलगाडीतून आपल्या शेतातील पिकविलेले धान्य आणत आहेत.
पावसाळ्यात वारंवार होणार्‍या त्रासाबाबत आमदार, खासदार, व संबंधित विभागाच्या उपअभियंता जलसंधारण अधिकारी सोलापूर व मृद जलसंधारण विभाग अक्कलकोट यांना लेखी व तोंडी सांगून सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तात्काळ उपाय योजना करावेत अशी मागणी रमेश चिडगुंपे, सिद्राम नरुणे, विठ्ठल बेळ्ळे, विश्वनाथ हन्नुरे, सुर्यकांत नरुणे, अब्दुल होटगी, धानय्या स्वामी यांच्यासह पन्नासहून अधिक शेतकर्‍यांनी उपअभियंता जलसंधारण अधिकारी सोलापूर व मृत जलसंधारण विभाग अक्कलकोट यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे.

About Author