नुतन वर्षाच्या मुहूर्तावर श्री स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा
। अक्कलकोट : प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊन मुळे गेल्या 9 महिन्यांपासून बंद असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर दिवाळीच्या मुहूर्तावर उघडण्यात आले. त्यानंतर नाताळ व शासकीय सुट्टया, दत्त जयंती उत्सव, थर्टी फस्ट, व नुतन वर्षाचे स्वागत या पाश्वभुमीवर दरवर्षाच्या वटवृक्ष मंदीरातील भाविकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग बळावू नये या करीता मा.जिल्हाधिकार्यांनी दिनांक 24 डिसेंबर 2020 ते दिनांक 2 जानेवारी 2021 अखेर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर बंद ठेवून सदर कालावधीत भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाईचे आदेश पारित केले होते. या आदेशास अनुसरून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर समितीने मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पाश्वभुमीवर मा. जिल्हाधिकारी साहेबांसोबत मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांची जिल्हाधिकारी साहेबांच्या निवासस्थानी दिनांक 27 डिसेंबर रोजी तोंडी चर्चा झाली. सदरहू चर्चेत कोरोना संसर्ग मंदीरात होवू नये या करिता मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सींगची व्यवस्था, मंदीर परिसरात सॅनिटायझर पुरवठा, मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन इत्यादी व्यवस्था दिवाळी पासून मंदीर उघडल्यानंतर करण्यात आल्याचे स्पष्ट करून याची अंमलबजावणी यापुढेही कायम राहणार असल्याचे सांगीतले. यामुळे नुतन वर्षाच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदीर भाविकांना स्वामी दर्शनाकरीता खुले करण्यात यावे अशी विनंती केली. या विनंती बाबत विचार विनीमय करून मा. जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर उघडण्याचे नविन आदेश पारित केले असल्यानेनुतन वर्षाच्या मुहूर्तावर 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांना स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्पष्टीकरण मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.
अन्नछत्र सुरु : शासनाच्या आदेशानुसार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे दि.1 जानेवारी 2021 पासून सुरु होणार असल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली. दरम्यान न्यासातील अन्नदानाची सेवा (महाप्रसाद) आणि निवासी व्यवस्था कोवीड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद होते. सदरचा निर्णय शासनाने श्री दत्त जयंतीनिमित्त घेण्यात आलेला होता. शासनाने दि.1 जानेवारीपासून अन्नछत्र सुरु करण्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आल्याचे न्यासाच्या सूत्रांनी सांगितले.



