नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा : खा.महास्वामीजी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
शावळ, दि.22 – भीमा नदी व हेब्बाळ ओढ्यातील महापुरामुळे हिळ्ळी परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींनी दिली.
त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, परशुराम यादवाड, मनोज गायकवाड, गणेश फडतरे, सचिन चव्हाण, बसवराज माने, निंगप्पा पुजारी, सहदेव चव्हाण, श्रीमंत येळमेली आदींनी पाहणी केली. हिळ्ळी, आंदेवाडी बु्र., शावळ या परिसरातील महापुरामुळे तूर, सूर्यफूल, मका, ज्वारी कडबा, ऊस, बाजरी, कांदा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही देऊन खासदारांनी शेतकर्यांना धीर दिला. प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली. पूर परिस्थितीमुळे फटका बसलेल्या तालुक्यातील विविध पिकांचे पंचनामे करावेत. नुकसानभरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, याची काळजी संबंधित अधिकार्यांनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार मरोड यांनी केले.