नन्हेगाव ते अरळी रस्त्याची दुरवस्था; डांबरीकरण करण्याची मागणी

nanhegav arali

। बोरेगाव : प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील नन्हेगाव ते अरळी रस्त्याची दुरवस्था झाली असून डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नन्हेगाव ते अरळी सहा किलोमीटर रस्त्याची पावसामुळे वाट लागली असून रस्त्यावर चिखल साचल्याने नागरिकांना चालताना त्रास होत आहे.

वाहने रस्त्यावरुन जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना अरळीला जाण्यासाठी हन्नूर मार्गे दहा किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे असल्याने नागरिकांना शेताला जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक निवडणुकीत रस्ता डांबरीकरण करण्याचे आश्वासन देतात, पण निवडणूक संपली की त्यांना याचा विसर पडतो.
नन्हेगाव ते अरळी रस्त्यावर महालक्ष्मी व सिद्धायप्पा देवाची मंदिरे आहेत. नवरात्र काळात महालक्ष्मी देवीची यात्रा भरते. पण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने भाविकांना दर्शनासाठी जाताना कसरत करावी लागत आहे. सध्या उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांची काढणी सुरू आहे. पण रास करण्यात आलेले धान्य शेतकर्‍यांना हन्नूर मार्गेच घरी आणावे लागत आहे. संपूर्ण रस्त्यावर चिखलाची दलदल आहे. त्यामुळे रस्त्यावरून बैलगाडी आणि वाहने जाऊ शकत नाहीत. माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अरळी-नन्हेगाव रस्ता डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले.
ग्राम पंचायतीच्यावतीने रस्ता डांबरीकरण करण्यात यावा, यासाठी ठराव संमत करून संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना पाठविण्यात आला. परंतु याची दखल घेण्यात आली नाही. शालेय विद्यार्थी आणि महिलांना पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते.
नन्हेगाव येथील अनेक शेतकर्‍यांची शेती या रस्त्याच्या कडेला आहे, पण रस्त्यावर दलदल असल्याने शेतकर्‍यांना शेतालाही जाता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी काढणीला आलेल्या पिकांची रास केली नाही.
संततधार पाऊस आणि चिखलमय रस्ता यामुळे खरिपाची पिके वाया गेली. नन्हेगाव आणि अरळी गावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी संबंधित विभागाने नन्हेगाव ते अरळी रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नन्हेगाव ग्राम स्थांनी दिला आहे.

About Author