दिलीप माने यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील दूध संकलन सुरु

। अक्कलकोट : प्रतिनिधी
जिल्हा दूध संघाला गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले अक्कलकोट तालुक्याचे संकलन सुरु झाल्याने शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत असून माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा संघाचे नूतन अध्यक्ष दिलीप माने यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात अन्य तालुक्यापेक्षा अक्कलकोट तालुका हा विविध माध्यमांतून विकासापासून कोसोदूर आहे. यामध्ये धवलक्रांतची तर कायमच पिछाडीवर आहे. जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील हे कार्यरत असताना तालुक्यातील दूध उत्पादकांना चालना देण्याचे काम केले. त्यांच्या काळात बर्याच दूधाच्या सहकारी संस्थाची निर्मिती झाली. त्यावेळी तालुक्यातील दूध बर्यापैकी जिल्हा दूध संघाला जात होते. मात्र त्यांच्यानंतरच्या काळात तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी हा उपेक्षित राहिल्याचे चित्र आहे.
अक्कलकोट, उत्तर व दक्षिण सोलापूर म्हणून एक संचालक आहे. आजवर अक्कलकोटला दोन वेळाच संधी मिळालेली आहे. यामध्ये संचालक म्हणून स्व.मोहनराव भंडारे हे पूर्वीच्या काळात कार्यरत होते. त्यानंतर शिवानंद पाटील यांच्या रुपाने अक्कलकोट तालुक्याला संधी मिळाली होती.
अन्य तालुक्यामध्ये तालुका दूध संघ कार्यरत आहेत. मात्र केवळ अक्कलकोटला संचालक अद्यापही नाही. जिल्ह्यातील सहकारी चळवळीतील कै.आ.ब्रह्मदेव माने यांचा वारसा माजी आमदार दिपलीराव माने यांनी सुरु ठेवलेला आहे. कै.आ.ब्रह्मदेव माने यांचा जो अक्कलकोट ालुक्याविषयी जिव्हाळा, प्रेम होता. तो दिलीप माने यांनी दूध संघाच्या माध्यमांतून अधोरेखित केल्याने दूध उत्पादक शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या दीड वर्षापासून जिल्हा दूध संघाला दूध संकलन बंद असल्याने दिलीप माने यांनी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी व संस्था प्रतिनिधीशी संवाद साधला. त्यांची गार्हाणी ऐकून घेतले. त्यांना येणार्या सर्व अडचणी तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्याची त्वरीत अंमलबजावणी देखील केली अन् केवळ चार दिवसात प्रतिदिनी 1 हजार लिटर दूधाचे संकलन अक्कलकोट तालुक्यातून सुरु झाले आहे.
प्रतिदिनी दूधाचे संकलन सुरु झाले असते तरी यामध्ये सातत्य राहून दूध संख्या वाढविणे, दूध उत्पादक शेतकर्यांना संघाच्या माध्यमांतून प्रोत्साहन योजना राबविणे याबाबत देखील सातत्य ठेवल्यास अक्कलकोट तालुका देखील जिल्ह्यातील इतर तालुक्याप्रमाणे धवलक्रांतीत आघाडी घेईल हीच अपेक्षा दूध उत्पादक शेतकरी संस्था चालक यांच्याकडून होत आहे.