तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना त्वरीत मदत द्या

Dada - new

आ.कल्याणशेट्टी यांची उपमुख्यामत्र्यांकडे मागणी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील झालेल्या पावसाने पुराने थैमान घातले, यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुरबाधित आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना त्वरीत राज्य शासनाकडून मदत देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एका पत्रकान्वये केले आहेत.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील हरणा, बोरी, भीमा, सीना या नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील व आसपासच्या परिसरातील सर्व गावे पूरबाधित झाले आहेत. त्याच बरोबरच अतिवृष्टीमुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मतदारसंघातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेले असून अनेक घरांची पडझड देखील झाली आहे. जनावरे दगावण्याचे प्रमाण देखील मोठी आहे. वर्षभर कष्ट करुन जपलेले पीक बळीराजाच्या डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. आधीच शेतकरी कर्जबाजारी आहेच त्यात या अस्मानी संकटामुळे बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे.
अशावेळी शासन म्हणून बळीराजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत देण्याची गरज आहे. अशा या परिस्थितीमधून बळीराजाला पुन्हा उभारण्यासाठी मदतीची नितांत गरज आहे. याबाबत शासन स्तरावरुन त्वरीत लक्ष घालून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील पूरबाधित व अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, नागरिकांना त्वरीत मदत करण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेली आहे.

About Author