चुंगीतील पूरग्रस्त पीडित अजूनही हलाकीतच; घरे वाहून गेल्याने शाळेतच बस्तान

। चुंगी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात न भूतो न भविष्यती अशी यावर्षी अतिवृष्टी झाली. त्यामुळे बोरी व हरणा या दोन्ही नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठी असलेल्या गावांना पुराचा मोठा फटका बसला. बोरी नदीवर वसलेल्या चुंगी गावातील 20 घरे वाहून गेली. त्यामुळे अजूनही सर्व कुटुंब धोंडूबाई स्वामी प्रशालेतच आपला फाटका तुटका संसार मांडला आहे.
यावर्षीच्या अतिवृष्टीने शेतातील ऊस, कांदा, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच. पण शेतातील मातीही वाहून गेली. अनेकांच्या विहिरी पूर्णपणे मातीने भरल्या .इलेक्ट्रिक मोटर, केबल आदी वाहून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. मायबाप सरकारने आम्हाला वार्यावर न सोडता आमच्या शेतीचे व पडझड झालेल्या घरांचे त्वरित पंचनामे करून मदत करावी अशी आर्त हाक नदीकाठावरील पूरग्रस्त पीडितांनी केली आहे. यापूर्वी सन 1968 मध्ये आलेल्या महापुरा पेक्षाही हे महापूर भयंकर आहे असे बुजुर्ग नागरिक सांगत आहेत. या महापुरामुळे शेतातील पत्र्याच्या शेडसह सोयाबीन, उडीद, कांदा, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. तरी त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी विनवणी हतबल शेतकर्याकडून होत आहे.
बोरी नदीच्या महापुराने उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक पुस्तके ,फर्निचर, जुने दप्तर, संगणक, कपाट आदी वस्तू पाण्यात भिजल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. वाचनालयाच्या स्थापनेपासून (1988)प्रथमच वाचनालयाच्या इमारतीमध्ये चार फुटापर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे शासनाकडून वाचनालयासाठी नुकसान भरपाई मिळावी .अशी मागणी सचिव सुरेश माने यांनी केली. तसेच चुंगी गावाच्या पूर्वेला बोरी नदी तर पश्चिमेला मोठा ओढा वाहतो. कुरनूर धरणाचे बॅक वॉटर ही चुंगी गावाला धोकादायक आहे. त्यामुळे भविष्यातही चुंगीकरांचे प्राण धोक्यातच आहेत. चुंगी, हन्नुर ,पितापूर या गावातही पाणी शिरले होते .तरी या सर्व गावाचे पुनर्वसन व्हावे. अशीही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.