चित्राच्या पावसाने रब्बी हंगामावर टांगती तलवार

Chapalgaon mandal1

। चपळगाव : प्रतिनिधी
चित्रा नक्षत्राच्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट तालूक्यात चपळगाव मंडलात जोरदार हजेरी लावली आहे.संपूर्ण सोलापूर जिल्हातुन सर्वाधिक पावसाची नोंद चपळगाव मंडलात झाली आहे.मंगळवारी सुरू झालेला पाऊस बुधवारपर्यंत 76 मिमी पडला.यामूळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच तालूक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे.
चपळगाव मंडलातील हन्नुर, किणी, सुलतानपूर, चुंगी, बर्‍हाणपूर, चपळगाव, दहिटणे, सिंदखेड,चपळगाववाडी,दहिटणेवाडी, हालहळ्ळी (अ),डोंबरजवळगे, बोरेगांव, दर्शनाळ यासह अनेक गावांमध्ये चित्रा नक्षत्राच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे.या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रब्बी हंगामावर देखील या पावसाचा फार मोठा परिणाम होणार आहे.या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे तर तुरीवर देखील परिणाम होणार आहे.पडलेल्या पावसाने अनेकांच्या शेतात पाणी घुसून बांध फुटले आहेत.शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने ज्वारीसाठी रान तयार करून ठेवले असले तरी ज्वारीची पेरणी आता काही दिवस खोळंबणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे भविष्यात जनावरांसाठी चारा दुर्मिळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक ठिकाणी ऊस आडवे पडल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होऊन शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.
दरम्यान या पावसाने अक्कलकोट तालूक्याच्या उत्तर भागातील नद्या,नाले,ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत.रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.रस्ते पाण्याखाली गेल्याने अशी अभूतपूर्व परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. हा पाऊस असाच कायम राहिल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
रब्बीचा हंगाम धोक्यात…
यावर्षी पावसाने प्रमाणापेक्षा जास्त हजेरी लावल्याने खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे.खरीपातील मुग,उडीदाचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकरी त्याच रानात ज्वारीचे उत्पादन घेतात.यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागते.मात्र यंदाची परिस्थिती पावसाने विस्कळीत केली आहे.अतिपिवसाने रानात मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहे. हे थण दुर करण्यासाठी शेतकरी तयारीत असताना पावसाने पून्हा थैमान घातले असल्याने आता ज्वारीसाठी रान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जिथे ज्वारीसाठी शेतकर्‍यांनी रान तयार केले आहे,त्याठिकाणी झालेल्या पावसाने पून्हा तण वाढणार असून ज्वारीच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांना कंबर कसावी लागणार आहे.

About Author