गायरान जमिन नसल्याने तालुक्यातील पशुधन व्यवसाय अडचणीत

। अक्कलकोट : प्रतिनिधी
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुधन व्यवसायाकडे आजपर्यंत पाहिले जाते. मात्र देशातील पर्जन्यमान खालावल्याने केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील प्रत्येक गावच्या गायरान जमिनी वनविभागाकडे देवून वृक्ष लागवड केली. यामुळे जनावरांना चरण्यासाठी गायरान जमिन नसल्याने हजारो जनावरे खाटकांच्या दारी गेली, यामुळे अक्कलकोट तालुक्यातील पशुधन व्यवसाय अडचणीत आला आहे.
शेकडो वर्षापासून शेतीला पूरक असणारी दुग्ध व्यवसायात विविध जातीच्या गायी, म्हैशी मुबलक दुध देणार्या वाण होते. कदाचित शेतकर्यांना निसर्गाने साथ दिले नाही तर दूध व्यवसायावर आपले प्रपंच चालवत होते. देशातील पर्जन्यमान वारंवार घटत असल्याने याचे परिणाम शेती उत्पदनावर होत आहे. याची गांभीर्य लक्षात घेवून शासनाने हवामान खात्याचा अहवाल मागितला. हवामान खात्याने अमाप वृक्ष तोडीमुळे पर्जन्यमान खालावल्याचे अहवाल शासन दरबारी सादर केले. त्यानुसार तत्कालीन केंद्र व राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे संकल्पना हातात घेतली आणि सामाजिक वनीकरण व सामाजिक वन विभाग यांची स्थापना करुन तालुक्यातील प्रत्येक गावातील गायरान जमीनी ताब्यात घेवून त्या ठिकाणी वृक्ष लागवड केले. त्यामुळे जनावरांना चरण्यासाठी कुरणच नसल्याने अक्कलकोट तालुक्यातील हजारो जनावरे खाटकाच्या दावणीला गेल्यामुळे पशुधनाची संख्या घटली आणि त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला.
महाराष्ट्र शासनाने पशुधनात व दुग्ध व्यवसायात वाढ व्हावा यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य पशुपालक व अल्पू भुधारक शेतकर्यांसाठी गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन, वराह पालन असे विविध 100 टक्के अनुदानित असलेल्या योजना राबविले असले तरी ते अत्यंत फोल ठरलेले आहेत. कारण गावात गायरानच नसल्यामुळे जनावरांना चरण्यासाठी चारा मिळत नसल्यामुळे ही योजना लाभार्थी व संबंधित पशुधन विकास अधिकारी यांच्या संगनमताने कागदी घोडे नाचवित अनुदान लाटण्यापुरते मर्यादित राहिले आहे. जोपर्यंत जनावरांना चरण्यासाठी कुरण व चार्याची व्यवस्था होत नाही. तोपर्यंत दुग्धवाढ व पशुधन विकास होणार नाही, हे मात्र निश्चित.
गेल्या पिढ्यान पिढ्यापासून घरच निरसं दूध पिऊन पैलवानगिरी करणार्यांची संख्या सुध्दा पशुधनाच्या कमतरतेमुळे घटलेली आहे. आता बाजारात कितीही पैसे दिले तरी निरसं दुध मिळत नाही. पाकिटातील पाश्चराईज्ड केलेले दूध मिळते, ते निव्वळ पचकळ पाणी. तेव्हा पशुधन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने काही तरी ठोस उपाय योजना करावा.
सत्तारभाई शेख, पशुपालक, बासलेगाव
जनावरांना चरण्यासाठी असलेली कुरण व गायरान जमिनी हे वनविभाग काबीज केल्यामुळे जनावरांची संख्या घटली आहे. पशुधन वाढीसाठी शासनाने विविध उपाय योजना राबवित आहे. मात्र तो कागदावरच. पशुधन अधिकारी यांनी पशुधन वृध्दीसाठी अक्कलकोट तालुक्यातील गाव, वाड्या, वस्त्या येथे जावून शेतकरी व पशुपालक यांना प्रबोधन करणे गरजेचे आहे. असे न केल्यास पशुधन इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही.
बसवराज भडोळे, दुग्ध व्यवसायिक, सलगर