केसर आंबा व्यवस्थापन

या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर फळधारणा झाली होती, परंतु मध्यंतरी आलेला अवकाळी पाऊस, गारपीट, वादळामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. येत्या काळात शिल्लक असलेल्या फळांची काढणीपूर्वी योग्य काळजी घ्यावी.
या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर फळधारणा झाली होती, परंतु मध्यंतरी आलेला अवकाळी पाऊस, गारपीट, वादळामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. येत्या काळात शिल्लक असलेल्या फळांची काढणीपूर्वी योग्य काळजी घ्यावी.
फळांना आकर्षक रंग, तजेलदारपणा येण्यासाठी फळात कोय तयार होण्याच्या स्थितीत 2 टक्के युरिया (20 ग्रॅम प्रती लिटर पाणी) अधिक 1 टक्का म्युरेट ऑफ पोटॅशची (10 ग्रॅम प्रती लिटर पाणी) फवारणी करावी.
फळांचा आकार वाढविण्यासाठी पाण्याची उपलब्धता असल्यास पूर्ण वाढ झालेल्या कलमास 15 दिवसांनी 2 ते 3 वेळा 150 ते 190 लिटर पाणी द्यावे.
सध्याच्या काळात तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याने फळांना प्रखर सूर्य किरणामुळे इजा होऊन प्रत खराब होऊ शकते. फळांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर पेपर बॅग ( 25 ु20 सेंमी ) लावून झाकल्यास डाग पडणार नाहीत.
फळांचा आकार वाढविण्याकरिता प्रत्येक घोसावर 1 ते 2 फळे ठेऊन बाकी फळांची विरळणी करावी.
फळे काढणी नंतर साठवणुकीत किंवा पिकविताना खराब होऊ नयेत, कुजू नये म्हणून काढणी पूर्वी 15 दिवस अगोदर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
साधारणपणे फलधारणेपासून पक्व होण्याकरिता हवामानानुसार तीन महिन्यांचा कालावधी लागतो म्हणून फळे योग्य वेळी तोडणे महत्त्वाचे ठरते.
कलमाखाली पाड वा टपका लागून रोज 2 ते 3 फळे झाडाखाली दिसत असल्यास फळे काढणीस तयार झाली असे समजून नूतन झेल्याचा वापर करून फळे एकाच टप्यात न उतरविता 2 ते 3 वेळा उतरावीत.
फळांची काढणी सकाळी 11 वाजेपर्यंत किवा सायंकाळी 4 नंतर तापमान कमी असताना करावी. फळांचा रंग फिक्कट हिरवा झाल्यास अशी फळे काढणीस तयार झाली असे समजावे.
आंबा फळांच्या देठाजवळील दोन्ही बाजू फुगून देठाच्या सम पातळीत आल्यावर फळे काढणीस तयार झाली असे समजावे.
पाऊस पडल्यानंतर काढलेली फळे हमखास कुजतात, त्यासाठी फळे तयार झाल्यानंतर काढणीस उशीर करू नये.
फळे काढताना वा काढणी नंतर फळांची हाताळणी करताना फळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. नूतन झेल्याने फळे तोडताना देठ 3.5 सेंमी ठेऊन काढणी करावी. फळे तोडताना देठ पूर्णपणे मोडल्यास फळातील चिकट द्रव फळावर पसरून फळाचा आकर्षकपणा कमी होतो.
फळे काढणीस तयार झाल्यानंतर फळाच्या वर तेलग्रंथी स्पस्टपणे दिसून येतात म्हणजे फळे ताबडतोब काढवीत.
आंबा फळे काढणी नंतर तापलेल्या जमिनीवर न ठेवता किंवा सावलीत एकमेंकावर न ठेवता सुटी ठेवावीत, जेणेकरून फळे एकमेकांना घासून ओरखडणार नाहीत.
आंबा विक्री करताना रंग, वजन, आकार पाहून, प्रतवारी करून विक्री करावी.